शुक्रवार, मार्च 5, 2021
Home क्रिकेट कोण आहे सचिनचा ३० वर्ष जुना विक्रम मोडणारी 'लेडी सेहवाग' शफाली वर्मा...???

कोण आहे सचिनचा ३० वर्ष जुना विक्रम मोडणारी ‘लेडी सेहवाग’ शफाली वर्मा…???

ज्या वयामध्ये बहुतेक युवा खेळाडू खेळाची बारकाई आणि खेळाचे नियम शिकत असतात त्या वयात शफालीने सचिनचा सर्वात कमी वयात अर्धशतक बनवण्याचा विक्रम मोडला आहे.

ज्या वयामध्ये बहुतेक युवा खेळाडू खेळाची बारकाई आणि खेळाचे नियम शिकत असतात त्या वयात शफालीने सचिनचा सर्वात कमी वयात अर्धशतक बनवण्याचा विक्रम मोडला आहे. गेल्या वर्षी सेंट लुसीया येथे वेस्ट-इंडिज महिला क्रिकेट संघाविरुद्ध सचिनचा हा विक्रम मोडत शफाली क्रिकेट जगतात प्रकाश झोतात आली होती.

सध्या औस्ट्रेलियामध्ये चालू असलेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत शफालीने परत एकदा कमाली केली.जगातील महिलांच्या क्रिकेट क्रमवारीत अव्वल अष्टपैलू खेळाडू असलेली एल्स पेरीने भारतीय महिला संघाविरुद्धच्या सामन्या अगोदर तिने ‘बुशफायर रिलीफ गेम’ मध्ये जेव्हा सचिनला गोलंदाजी केली होती बहुतेक तेव्हा तिने विचारही केला नसेल की दुसर्‍या दिवशी ही सचिन सारखी ‘बॅकलिफ्ट’ असणारी आणि सेहवाग सारखा कमी ‘फूटवर्क’ असलेली एक १५ वर्षांची मुलगी तिला मैदानाच्या जवळ-जवळ प्रत्येक कानाकोपर्‍यात चौकार आणि षटकार लगावेल.

शफाली वर्माला जास्त गुंतागुंतिचा खेळ आवडत नाही. त्याऐवजी ती वीरेंद्र सेहवागच्या ‘लुक-बॉल, हिट-बॉल’ या मंत्राचा अवलंब करते, जो की आतापर्यंत तिच्यासाठी खूपच जास्त उपयुक्त ठरला आहे. महिला टी-२० क्रिकेटमध्ये मिताली राज आणि हरमनप्रीत कौरच्या मते सलामवीर म्हणून खेळताना १५ ते २० चेंडुंमध्ये ४० ते ५० धावा करणे भारतीय महिला संघासाठी सोनेरी कामगिरी करण्या सारखे आहे. तिने सध्या चालू असलेल्या महिला टी-२० विश्वचषकात मागच्या दोन सामन्यात औस्ट्रेलिया आणि बांग्लादेश विरुद्ध अप्रतिम खेळ करुन संपूर्ण क्रिकेट जगताचे मन जिंकले आहे.

शफालीचे वडील संजीव वर्मा यांनी खुलासा केला आहे की शफालीला क्रिकेट खेळण्यासाठी मुलाची वेशभूषा करावी लागत असे. तिचे वडील तिला शेजारच्या स्थानिक संघांसमवेत क्रिकेट खेळायला नेत असत, पण मुलगी असल्याने शफाली समवेत खेळण्यास कुणीही लवकर तयार होत नसायचे. तिच्या घराजवळ मुलींसाठी अकादमी नसल्यामुळे, तिच्या वडिलांनी तिला मुलांच्या अकादमीमध्ये प्रवेश घेऊन दिला. आपले केस लहान करुन, तिने प्रशिक्षण घेण्यासाठी स्वतःला मुलांच्या वेषात बदलले. यानंतर, वर्मा कुटुंबीयांना त्यांच्या मुलीला क्रिकेट खेळण्यासाठी इतर अडथळ्यांचा सामना करावा लागला. शेजारी आणि नातेवाईक आपल्या मुलीला क्रिकेट खेळू देण्याबद्दल सहसा शफलीच्या आई-वडिलांची चेष्टा करत असत. तिने कबूल केले आहे की त्या तरुण वयात पुरुष गोलंदाजांना तोंड देताना मला नेहमीच कठीण वाटले, परंतु बालवयापासून घेतलेल्या या मेहनतीने तिला भविष्यातील आव्हानांसाठी तयार केले.

राम नारायण अ‍ॅकॅडमीमध्ये शिक्षण घेत असताना प्रशिक्षक अश्वनी कुमार यांना आढळले की ती आपल्या वयोगटातील स्तरापेक्षा चांगली आहे. अश्विनी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “मुलींसोबत खेळताना तिला कधीही अडचण नाही यायची आणि ती मुलींना सहजरीत्या मैदानाच्या प्रत्येक कान्याकोपर्‍यात षटकार लावायची तिची मुलींसोबत काही बरोबरीच नव्हती म्हणून मी तिला १९ वर्षाच्या मुलांबरोबर खेळवायला सुरुवात केली आणि तिथे सुद्धा ती १९ वर्षांखालील मुलांना अप्रतिम असे फटके लावायची. तिला खेळताना बघून वीरेंद्र सेहवागच्या खेळाची आठवण व्ह्यायची.”

एकदा फीमेलक्रिकेट.कॉमला दिलेल्या मुलाखतीत तिने संगितले की, “माझ्या वडिलांनी मला अगदी सुरुवातीपासूनच प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्यामुळेच मी मुलांबरोबर खेळायला तयार झाले. त्याने मला नेहमी निर्भिडपणे खेळायला सांगितले आणि तेव्हापासून मी ते करत आहे. अशा प्रकारे न खेळण्याची कल्पनाही करु शकत नाही.”

शफालीची यशोगाथा खरच खूपच प्रेरणादायी आहे आपण आशा करु शकतो की शफाली बद्दलचा हा लेख वाचल्यानंतर अनेक पालक आपल्या मुलींना कोणत्याही प्रकारचा क्रीडा प्रकार खेळण्यापासून रोखणार नाहीत आणि त्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी शेफाली वर्माच्या वडिलांसारखी मेहनत घेऊन त्यांच्या क्रीडा कारकीर्दसाठी मोलाचा वाटा उचलतील.